व्हायब्रंट गोवामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल: मुख्यमंत्री

0
487
 गोवा खबर: व्हायब्रंट गोवा ही  परिषद तसेच प्रदर्शन 2019  गोव्यात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ही परिषद होणरा आहे. त्यात सुमारे 2000 देशी तर 500 विदेशी प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुखर्जी स्टेडियमवरील परिषदगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजकुमार कामत, मनोज पाटील, नितीन कुंकळ्येकर यांनीही परिषदेविषयी माहिती दिली.
 व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनतर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली असून गेले वर्षभर त्याची तयारी सुरू आहे. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य सरकारने 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या परिषदेमुळे देश विदेशातील गुंतवणूकदार गोव्यात येणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्याची फळे वर्षभरातच मिळतील, अनेक उद्योग गोव्यात सुरू होतील, बेकारांना मोठया प्रमाणात नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या परिषदेसाठी देशभरात 30 ठिकाणी रोड शो करण्यात आले तसेच 17 देशात त्याची माहिती प्रसारित करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून 52 देशातून प्रतिनिधींची नोंदणी झाल्याचे  आयोजकांनी यावेळी सांगितले.
गोव्यात व्हायब्रंट गोवा परिषद व्हावी, अशी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. 
गोव्यातील उद्योजकांना तसेच जनतेला ही परिषद म्हणजे एक सुवर्णसंधी असून त्यांनी आवश्य भेट द्यावी. तेथे प्रवेश मोफत आहे आणि कोणतेही शुल्क आकारले जाणरा नाही. परिषदेत इंडिया टुडे तर्फे गोव्यातील तालुका पातळीवर विविध क्षेत्रात पुरस्कारही देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.