राधानगरीत अडकले गोव्याचे प्रवासी;मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेऊन पोचवली मदत

0
320
 गोवा खबर:पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि  गोव्याचे सुमारे दीडशे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने राधानगरी येथे अडकून पडले आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेत प्रवाशांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
 राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर बस पाण्यात अडकली असून त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे येथून सुमारे दिडशे प्रवाशांना घेऊन  बारा बसेस गोव्यात येत होत्या. काल (५ ऑगस्ट) सोमवार मध्यरात्री अडीज वाजता सदर बसेस कोल्हापूर येथे दाखल झाल्या. कोल्हापूरात पोहोचल्यानंतर पुढील महामार्गावर पुराचे पाणी आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहुन गोव्यात येण्यासाठी मॅपचा आधार घेत गारगोटी, देवगड हा अंतर्गत रस्ता धरला. या रस्यावर पूर्वीपासून पाणी आले होते. याची माहिती बस चालकांना नसल्याने त्यांनी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोहोचताच त्यांना येथील सर्व गाव पाण्याखाली गेल्याचे समजले. सर्व बसेस मागे नेण्याचा प्रयत्न केला असता मागील भाग सुद्धा पाण्यात बुडल्याचे त्यांना आढळून आले.
 पोलिटिकल सायन्सच्या गोव्यातील शिक्षिका संस्कृती आईर यांनी  सकाळी दहाच्या दरम्यान आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगितले.
जवळच्या गावातील सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने दुसऱ्या जागी हलवले आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कोणीच उपस्थित नाही.पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आल्या नंतर इतरांना मदत केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे आईर यानी सांगितले. अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये वृद्ध,महिला आणि मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याचा स्तर वाढत चालल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.