त्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार:चेललाकुमार

0
830
गोवा खबर:काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेल्या गोव्यातील दहाही आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यातर्गंत अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती काँगेसचे केंद्रीय निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार यांनी दिली.
गोव्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी डॉ चेल्लाकुमार बुधवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले. दहाही आमदारांना भाजप कडून कोट्यवधींची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळेच आमदारांनी भाजपात उडी घेतली असा आरोप त्यांनी केला.
गोव्यात पोचलेल्या चेल्लाकुमार यांनी प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो आणि आलेक्स रेजिनालड लॉरेन्स या  आमदारांची भेट घेऊन पुढील वाटचाली बाबत चर्चा केली.
 लवकरच नवीन विरोधी पक्ष नेता निवडला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
शेजारील कर्नाटकातील काँग्रेस आमदारांच्या फुटीचे राजकीय नाट्य रंगात आले असतानाच गोव्यातही तसाच राजकीय भूकंप झाला. राज्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असून काँग्रेसकडे एकूण पंधरा आमदारांचे संख्याबळ होते. पाच आमदार वगळता उर्वरित दहा आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला भगदाड पडले आहे.काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देखील गमवावे लागले आहे.