बाबू कवळेकर नवे उपमुख्यमंत्री?

0
640
मंत्रिमंडळात मोठे बदल अपेक्षित, अनेकांना अर्धचंद्र
 गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे  मंत्रिमंडळात फार मोठे बदल घडवण्याच्या तयारीत आहेत.  सध्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हटवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विजय सरदेसाई व बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री आहेत.गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल.बाबू आजगावकर यांचे उपमुख्यमंत्रीपद काढून घेतले जाईल मात्र ते मंत्री राहतील. बाबू कवळेकर यांना आता नवे उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे.
 उपसभाती मायकल लोबो यांची यावेळी मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.बाबुश मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना देखील मंत्रिपदे मिळतील असा अंदाज आहे. बहुतेक सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फार मोठे बदल होतील, असा अंदाज आहे.
आज अमित शहा, पंतप्रधानांना भेटणार!
रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीकडे प्रयाण केले. आज हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत.

मंत्रिमंडळाची पुनर्रचना उद्या!
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना उद्या शुक्रवारी करण्याची शक्यता आहे. त्यानुसार अपक्ष व गोवा फॉरवर्डच्या सर्व मंत्र्यांना वगळण्याची दाट शक्यता आहे. राज्यपाल मृदूला सिन्हा रात्री उशिरा तथा पहाटे गोव्यात पोचतील अशी माहिती काल सूत्रानी दिली आहे.
आज नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन सायंकाळी उशिरा ही सर्व मंडळी गोव्यात पोहोचणार व त्यानंतर रात्री उशिरा शपथविधी होऊन शुक्रवारी मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे.
विधानसभेतील ताज बलाबल
भाजप             27            काँग्रेस            05
अपक्ष            03             मगो                01
गोवाफॉरवर्ड      03           राष्ट्रवादी           01
गोवा फॉरवर्ड, अपक्ष सरकारचा पाठिंबा काढणार?
दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नाराज झालेल्या गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत विचार चालवला आहे. पुढील दोन दिवसांत डॉ. प्रमोद सावंत कोणता निर्णय घेतात यावर गोवा फॉरवर्ड निर्णय घेईल. त्याचबरोबर तिन्ही अपक्षांचे महत्त्व शून्यावर आल्याने ते देखील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते पदही गेले!
भाजपने गोव्यात काँगेसला मोठे भगदाड पडल्याने काँग्रेसची फार दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाचे विरोधी पक्षनेते पद सुद्धा गेले. पक्षाकडे आता केवळ पाच आमदार राहिले आहेत. किमान 10 आमदार असले तरच विरोधी पक्षनेते पद मिळते. आता ते पदही या पक्षाला देता येणार नाही.
अधिवेशन 15 जुलैपासून
विधानसभेचे अधिवेशन 15 जुलैपासून सोमवारी सुरु होत आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळात मोठे बदल होतील. तथापि, मंगळवारी काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक घेऊन त्यात भाजप आघाडी सरकारातील भ्रष्टाचाराची प्रकरणे व इतर काही प्रकरणे घेऊन विधानसभेत सरकारला धारेवर धरले जाईल अशी घोषणा करणाऱ्या बाबू कवळेकर यांच्या भूमिकेत आता अचानक बदल झाला. रवी नाईक यांनी  2000 मध्ये काँग्रेस विधीमंडळ नेता तथा विरोधी पक्षनेता असताना काँग्रेसमधून आठ आमदारांना फोडून आणून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबू कवळेकर हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. यांनी तर आपल्याबरोबर चक्क नऊ आमदार घेऊन भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

मोन्सेरात यांच्या घरी घडले शिजले नाट्य

विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांच्यासमवेत  काँगेसचे दहा आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या बंगल्यावर मंगळवारपासून ठाण मांडून होते आणि तिथेच पक्षांतराबाबतची खलबते  झाली. उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.नुवेचे आमदार विल्फ्रेड डीसा वगळता इतर सर्व आमदारांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्‍चित केले होते. अखेर बुधवारी पहाटे डीसा यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

काँग्रेसचे दहा आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा  गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उपमुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या  वागण्यावरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सुमारे दोन आठवड्यांपासून आपल्या निकटवर्तीयांना आणि हितचिंतकांना आपल्या भाजप प्रवेशाची कल्पनाही दिली होती.पणजीत ही खलबते सुरू होती. मंगळवारी रात्री बाबू कवळेकर, नुवेचे आमदार विल्फ्रेड डीसा, कुंकळीचे आमदार क्लाफासियो डायस, काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस आणि वेळ्ळीचे आमदार फिलिप नेरी यांच्यासह बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्यात दाखल झालेे. आमदार डीसा यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने पहाटेपर्यंत त्यांचा निर्णय होऊ शकला नव्हता.अखेर प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर डीसा यांनी भाजप प्रवेश  निश्चित केला. बुधवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास बाबू कवळेकर आपल्या बेतुल येथील बंगल्यात दाखल झाले.जराही वेळ विश्रांती न घेता त्यांनी स्नान आणि पूजा अर्चा आटोपून सकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा पणजी गाठली.