गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे राजेश पाटणेकर

0
122
 गोवा खबर:गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांची 22 विरुद्ध 16 मतांनी निवड झाली.
गोवा  विधानसभेच्या सभापती पदासाठी भाजप आघाडीतर्फे डिचोलीचे आमदार  राजेश पाटणेकर तर काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपले विधानसभा सचिवांच्‍यासमोर  सादर केले होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी तत्कालीन सभापती असलेल्या प्रमोद सावंत यांची निवड झाली होती.त्यामुळे सभापती पद रिक्त झाले होते.दरम्यानच्या काळात उपसभापती मायकल लोबो यांनी हंगामी सभापती म्हणून काम पाहिले होते.आपण सभापती पडासाठी इच्छुक नसल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे इतर नावांवर भाजपला विचार करावा लागला होता.
भाजप गाभा समितीच्या बैठकीत सभापतीसाठी राजेश पाटणेकर यांच्या सोबत शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मयेचे आमदार प्रवीण झांट्ये अशी तीन नावे सूचवण्यात आली होती. यातील पाटणेकर यांच्या नावाला समितीने एकमताने पसंती दिली होती.

भाजप आघाडीकडे भाजपचे 17,3 गोवा फॉरवर्ड पक्ष आणि 3 अपक्ष मिळून 23 चे संख्याबळ असल्याने  पाटणेकर सभापतीपदी निवडून येण्यास कोणतीच अडचण आली नाही.
संख्याबळ अपूरे असताना देखील काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.त्यांच्या बाजूने 16 मते पडली.मगोचे एकमेव आमदार असलेल्या सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसला मतदान केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव गैर हजर राहिले.
पाटणेकर हे 55 वर्षीय असून ते 2002-07 , 2007- 12 आणि 2017 सालच्या विधानसभा निवडणूकीत डिचोली मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष, सार्वजनिक लेखा समितचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते सध्या गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
विधानसभा सभापती निवडीसाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आज एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते.