ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोग

0
402

 गोवा खबर:मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांकडे येत असून, हे वृत्त आणि आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. माध्यमांवरुन व्हाइरल झालेली दृश्ये, मतदान झालेल्या कुठल्याही मतदान यंत्रांची नाहीत.

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, कडक सुरक्षेत संबंधित स्ट्राँगरुम्समध्ये आणण्यात आली. निवडणूक आयोगाचे निरिक्षक आणि उमेदवारांच्या उपस्थितीत ती कुलुपबंद करण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्हीद्वारे सतत देखरेख ठेवली जात आहे. प्रत्येक स्ट्राँगरुमवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा 24 तास पहारा आहे. याशिवाय उमेदवार किंवा त्यांनी नेमलेल्या व्यक्तीही स्ट्राँगरुमवर 24 तास देखरेख ठेवून आहेत.

मतमोजणीच्या दिवशी उमेदवार / एजंट्स आणि निरिक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडल्या जातात आणि त्याचेही चित्रिकरण केले जाते. मतमोजणी सुरु होण्यापूर्वी काऊंटिंग एजंट्सना, ईव्हीएम क्रमांक आदी संबंधित बाबी दाखवून समाधान केले जाते, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.