मनोहर पर्रिकर यांचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर पणजीत लढणार भाजप विरोधात

0
960
गोवा खबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे एकवेळचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर  पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्याविषयीची घोषणा आज शुक्रवारी पणजीत करण्यात आली आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतरची सहानुभूती पणजीत आता निश्चितच नाही,  पर्रीकरांविषयी लोकांना आदर असला तरी, पणजीचे मतदार शेवटी पणजीचे हित लक्षात घेऊनच मतदान करतील, ते कुणा एका कुटूंबाला मते देणार नाहीत, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले आहे. वेलिंगकर यांचा सामना पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
गोवा सुरक्षा मंचातर्फे वेलिंगकर लढणार आहेत. सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक अरविंद भाटीकर यांनी वेलिंगकर यांच्या नावाची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.
पणजीतील लोकांनी वेलिंगकर यांनाच तुम्ही उमेदवार म्हणून उभे करा, आम्ही पाठींबा देऊ असे आम्हाला सांगितले व त्यामुळे सुरक्षा मंचाने वेलिंगकर यांचे नाव निश्चित केल्याचे  भाटीकर म्हणाले आहेत.
पांडुरंग नाडकर्णी, किरण नायक, महेश म्हांब्रे, अ‍ॅड. स्वाती केरकर, श्री. खंवटे आदी यावेळी व्यासपीठावर होते.
सुभाष वेलिंगकर म्हणाले, आपण पणजीमध्येच लहानाचा मोठा झालो. आपला जन्म पणजीत झाला. भाजपाने पणजीत फक्त बाबूश मोन्सेरात यांच्या सोयीचेच राजकारण केले. त्यासाठी ताळगाव मतदारसंघाचा भाजपाने बळी दिला.
 पणजीची गेली पंचवीस वर्षे लुट झाली,असा आरोप करून वेलिंगकर म्हणाले, पणजी शहर फसवले गेले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास किती झाला व कमिशन किती खाल्ले गेले हे पणजीवासियांना ठाऊक आहे. आम्हाला तत्त्वाधिष्ठीत राजकारण करायचे आहे. पर्रीकर यांच्याविषयी पणजीवासियांना आदर आहे पण निधनानंतर सहानुभूती राहिलेली नाही. आदराचा लाभ हा भाजपाला होणार नाही. कारण पर्रीकर यांच्या अस्थी कलशावेळीही काहीच गर्दी नव्हती. बांबोळीतील मोदींच्या सभेलाही गर्दी झाली नाही. पणजीचे हित कोणत्या गोष्टीत आहे ते पाहून पणजीवासिय मतदान करतील.
दरम्यान आज काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार बाबूश मोन्सेरात आणि आपतर्फे वाल्मिकी नाईक यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.भाजप तर्फे उत्पल पर्रिकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे चर्चेत असून अजुन भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.गोवा सुरक्षा मंचतर्फे वेलिंगकर आपला उमेदवारी अर्ज सोमवारी सादर करणार आहेत.