भाजपची विनंती मानून उत्पल पणजीची निवडणूक लढवणार ?

0
666
गोवा खबर : दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पर्रिकर यांचा मुलगा उत्पल  याचे नाव जोरदार चर्चेत आहे.पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांना पर्रिकर यांचा राजकीय वारसा चालवण्याची विनंती केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिल्यामुळे पणजीच्या उमेदवारीसाठी उत्पलच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे.
स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे.
 उत्पल व अभिजात हे पर्रीकर यांचे दोन विवाहित मुलगे आहेत. पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही पर्रीकर यांच्याप्रमाणेच भाजपाचे काम करावे, अशी विनंती त्यांना केली. ही माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पर्रीकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे काय, असे पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकर म्हणाले की तसा कोणताच विषय झालेला नाही. फक्त पक्षाचे काम करावे एवढीच विनंती खन्ना यांनी केली आहे. वडिलांनी जसे भाजपाचे काम केले, तसेच मुलांनीही ते सुरू ठेवावे, अशी विनंती खन्ना यांनी केली. ती विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरवण्यासारखी स्थिती नव्हती. कारण दोन्ही मुलांना निधनाचे दु:ख होते व त्यामुळे जास्त चर्चा झाली नाही,असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा
उत्पलचे नाव चर्चेत आले आहे.