गोव्यात लोकसभे बरोबरच 23 एप्रिल रोजी विधानसभेच्या पोटनिवडणुका

0
261
गोवा खबर:गोव्यातील लोकसभेच्या 2 जागांसाठी 23 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.या दोन जागांच्या निवडणुकां सोबत मांद्रे,शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत.दोन्ही निवडणुकांचा निकाल तब्बल एका महिन्या नंतर 23 मे रोजी लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.त्यानंतर गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूकांची स्वतंत्रपणे माहीती दिली.
गोव्यात लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा 2 जागा आहेत.त्यांच्या निवडणुका 23 एप्रिल रोजी होणार असून त्याच दिवशी म्हापसा,मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत.म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी एकाच मतदान केंद्रावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी मतदान करता येणार आहे.तशी व्यवस्था निवडणुक आयोगा कडून केली जाणार आहे.त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील मतदारांना एकाच दिवशी दोनवेळा मतदान करावे लागणार आहे.

 उत्तर व दक्षिण गोवा या लोकसभेच्या दोन मतदारसंघाबरोबरच पोटनिवडणूक असलेल्या मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. एकाचवेळी या पाचही जागासाठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमही समान असणार आहे.

निवडणुकीची अधिसूचना 23 मार्च रोजी जाहीर होईल. 28 मार्च पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल व 8 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. 23 एप्रिल रोजी लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. 23 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

उत्तर गोव्यात एकूण मतदारांची संख्या 5,54072 एवढी आहे तर दक्षिण गोव्यात 577546 एवढी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे राज्यात एकूण मतदारसंख्या 11 लाख 31618 एवढी आहे. मतदारयादी फेररचना कार्यक्रमामुळे 4886 मतदारांची यादीत भर पडली आहे. जानेवारी 2019 मध्ये मतदारयादी फेरआढावा घेण्यात आला होता. अगोदर मतदारसंख्या 11 लाख 26732 एवढी होती. अजूनही ज्या मतदारांना मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करायचा असेल त्याचा 4 एप्रिलपर्यंत समावेश केला जाणार आहे. मात्र त्यासाठी दहा दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. 25 मार्चपर्यंत येणाऱया अर्जावर निवडणूक आयोग विचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोटनिवडणूक होत असलेल्या म्हापसा मतदारसंघात मतदारांची संख्या 29103 एवढी आहे. मांद्रे मतदारसंघात मतदारांची संख्या 32129 एवढी तर शिरोडा मतदारसंघात मतदारांची संख्या 28919 एवढी आहे. गोव्यात सर्वाधिक मतदार वास्को मतदारसंघात असून तेथे 34640 एवढी आहे तर सांतआंद्रे मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 20929 एवढे मतदार आहेत. देशाच्या विविध भागात किंवा विदेशात मिळून 276 मतदार आहेत. शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या मतदारांची संख्या 5046 एवढी आहे. एकूण 1652 मतदानकेंद्रे असून या सर्व मतदान केंद्रावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत जाहिरात द्यावी लागेल

ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असेल किंवा पोलिसांत तक्रारी दाखल केलेल्या असतील तर अशा उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच नंतर दोन दिवस मिळून एकूण तीन दिवस जाहिरात द्यावी लागेल तसेच किमान तीन वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल, असेही कुणाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here