राहुल गांधी उद्या गोव्यात फोडणार प्रचाराचा नारळ

0
237

गोवा खबर:काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उद्या  गोव्यात येऊन मार्गदर्शन करणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह पसरला आहे. त्यांच्या आगमनामुळे गोव्यातील काँग्रेसची ताकद वाढेल, आणि लोकसभेच्या दोन्ही जागा व तिन्ही विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष जिंकेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार  त्यांना भेटणार असून खाणग्रस्त लोकांशी ते चर्चा करतील. प्रत्येक मतदारसंघातून जास्तीत जास्त बुथ कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर तसेच दोन्ही जिल्हा समित्यांवर सोपवण्यात आली आहे. गोव्यातील जनतेची केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारने फसवणूक केली असून जनता संतापलेली आहे. त्याचा राग निवडणुकीत दिसून येईल. त्या पक्षाला धडा शिकवण्याचा निर्णय जनतेने घेतला असून लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षच जिंकेल, अशी खात्री त्यांनी वर्तविली. गोव्यातील खाण तसेच बेकारी व राफेल आणि इतर विषयांवर गांधी बोलतील, असेही चोडणकर यांनी सूचित केले.

पत्रकार परिषदेत कॉग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, डॉ. प्रमोद साळगावकर, सुनील कवठणकर, एम. के. शेख हे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here