गोव्यातील राफेल ऑडियो क्लिप पुन्हा चर्चेत

0
277
गोवा खबर: केंद्र सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात राफेलच्या काही फाइल्स गहाळ झाल्याची माहिती दिल्याची बातमी येताच गोवा प्रदेश काँग्रेसने गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कथित राफेल ऑडियो क्लिपचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
दीड महिन्यापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित राफेल ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती.त्यात राणे एका व्यक्ति सोबत बोलताना मंत्रीमंडळ बैठकीचा हवाला देत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राफेलच्या फाइल्स आपल्या बेडरूम मध्ये असल्याचे म्हटले असल्याची माहिती दिली होती.तोच धागा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, ती ऑडियो क्लिप बनावट असल्याचा दावा आरोग्यमंत्री राणे यांनी केला होता.मात्र विषय गंभीर असून देखील त्यावर पोलिस यंत्रणे कडे तक्रार झाली नाही किंवा त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत.हे पाहता हा प्रकार संशयास्पद वाटत होता.आता सरकारनेच काही फाइल्स गहाळ झाल्याचे मान्य केल्यामुळे त्या ऑडियो क्लिप मधील संभाषण खरे तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे.
चोडणकर म्हणाले,माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्या ऑडियो क्लिप नंतर आपल्याकड़े तशा कोणत्याच फाइल्स नाहीत असे म्हटल्याचे ऐकिवात नाही.त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या कथित राफेल ऑडियो क्लिपची सुमोटो पद्धतीने दखल घेऊन योग्य ती  कारवाई करायला हवी.