हॉटेलमध्ये बॉब असल्याचा बनावट कॉल केल्या प्रकरणी मुंबईच्या युवतीला गोव्यात अटक

0
371
गोवा खबर : उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध आणि पर्यटकांनी गजबजलेल्या कळंगुट परिसरातील एका  हॉटेलमधील वेटर बरोबर झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हॉटेलात बॉम्ब असल्याचा 
बनावट कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला करुन  तारांबळ उडवणाऱ्या मालाड मुंबई  येथील एका युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. 
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार रंगोली परेश पटेल असे या २३ वर्षीय युवतीचे नाव असून ती  मुंबईतील मालाड (पश्चिम) भागात राहते. तिच्यावर गुन्हा नोंद करुन तिला अटक करण्यात आली आहे. युवतीने वापरलेला फोनही ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीताराम मळीक, पोलीस निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
हा  प्रकार रात्री सव्वाएकच्या सुमाराला कळंगुट परिसरात घडला. पोलीस निरिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट भागातील एका  हॉटेलात बॉम्ब असल्याची माहिती पणजी येथील  नियंत्रण कक्षाला मिळाली होती.तेथून कळंगुट पोलिसांना त्याची माहिती मिळताच पोलिसांनी हालचाली करुन  हॉटेलमध्ये जाऊन शोध माहिम हाती घेतली.दरम्यानच्या काळात बीडीडीएस, दहशतवादी विरोधी आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी हॉटेल खाली करण्याची सूचना  व्यवस्थापनाला करून शोध मोहिम हाती घेतली. दाखल झालेल्या सर्व पथकांनी हॉटेलची तपासणी सुरु केली. सुमारे दोन तासाच्या तपासणीनंतर हॉटेलात बॉम्ब ठेवल्यासंबंधी करण्यात आलेला फोन बनावट  असल्याचे आढळून आले.
हॉटेलची तपासणी सुरु असताना दुसरीकडे बनावट फोन करणाऱ्या त्या युवतीचा शोधही कळंगुट पोलिसांनी सुरु केला होता. परिसरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता त्याच हॉटेलाला लागून असलेल्या दुसऱ्या हॉटेलात ती युवती आपल्या मैत्रिणीसोबत वास्तव्य करुन असल्याचे आढळून आले. अधिक चौकशीसाठी त्या युवतीला पोलीस स्थानकात आणण्यात आले.
 चौकशीदरम्यान आपणच तो फोन केल्याची कबुली त्या युवतीने पोलिसांना दिली. संबंधित हॉटेलातील वेटरसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी व त्या हॉटेलची बदनामी व्हावी व त्यांची नुकसानी व्हावी या हेतूने हे कृत्य केल्याची कबूली चौकशी दरम्यान दिली.