आयुर्वेद ही भारताची जगाला देणगी-श्रीपाद नाईक

0
1109
केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवाप्रसंगी आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन करुन पाहणी करताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक

दोन दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवाचे उदघाटन

गोवा खबर:आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार श्रीपाद नाईक यांनी केले. ते आज दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत आयोजित केलेल्या पहिल्या आयुर्वेद युवा महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

आज आपला देश मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो, ही चिंतेची बाब आहे. यावर आयुषच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व संस्था आणि शासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपली परंपरागत कुटुंबपद्धती सांभाळून युवकांना योग्य दिशा दिली जाऊ शकते. समाजात नैराश्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी कुटुंब अतिशय महत्वाचा घटक आहे.

आयुर्वेद केवळ आरोग्य उपचार प्रणाली नाही तर ती एक संतुलित जीवनपद्धती आहे. युवकांना आयुर्वेदाच्या माध्यमातून सुदृढ आणि निरोगी जीवनपद्धतीविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेद युवा महोत्सवाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. आयुर्वेद युवा महोत्सवात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात आयोजित करण्यात आलेला आयुर्वेद युवा महोत्सव आयुष मंत्रालयाच्या 25 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग आहे. सोमवारी महोत्सवाची सांगता होणार आहे.

युवा महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. वरुण साहनी, डॉ एस नारायण, उपमहासंचालक, सीसीआरएएस-नवी दिल्ली, डॉ आदर्श कुमार, सहायक संचालक, सीसीआरएएस- नवी दिल्ली, डॉ एस. गायधनी, सहायक संचालक, सीसीआरएएस-नवी दिल्ली, राज्य सरकारच्या आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ संजीव दळवी यांची उपस्थिती होती.