संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या ‘सचेत’ या गस्ती नौकेचे जलावतरण

0
307

  

गोवा खबर:संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांच्या हस्ते आज गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या स्वदेशी बनावटीच्या गस्ती नौकेचे जलावतरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी बी नागपाल यांची उपस्थिती होती. भारतीय तटरक्षक दलासाठी बांधल्या जाणाऱ्या पाच गस्ती नौकांपैकी ही पहिली नौका असून ती तटरक्षक दलाच्या ताफ्यात जानेवारी 2020 मध्ये दाखल होईल.

संरक्षण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्यमांनी आता जागतिक बाजारपेठेकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता याप्रसंगी संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, संरक्षण क्षेत्र उत्पादनात खासगी उद्योगांनी प्रवेश केल्यामुळे निकोप स्पर्धा निर्माण झाली आहे. सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील उद्यम चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी आपली गुणवत्ता तर सिद्ध केलीच आहे पण आता जागतिक बाजारपेठही काबीज केली पाहिजे.

पंतप्रधानांच्या हस्ते 13 नोव्हेंबर 2016 रोजी या पाच गस्तीनौका बांधणी प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले होते. तर, 20 मार्च 2017 रोजी तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक के नटराजन यांच्या हस्ते या गस्तीनौकेचा पायाभरणी सोहळा पार पडला होता. गस्तीनौकेचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी 2020 मध्ये ती भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आलेली गस्तीनौका 2400 टन वजनाची असून बोटींच्या सुटकेसाठी जलद प्रतिसाद प्रणाली, चाचेगिरीला आळा घालणारी आहे.

तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले की, तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यातील भागीदारीमुळेच तटरक्षक दलाकडील जास्तीत जास्त नौका गोवा शिपयार्ड निर्मित आहेत.

गोवा शिपयार्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी बी नागपाल यांनी भारतीय नौदलासाठी दोन लढाऊ गलबतांच्या बांधणीचे (फ्रिजेट) कंत्राट दिल्याबद्दल संरक्षणमंत्रालयाचे आभार मानले. तसेच गोवा शिपयार्ड लिमिटेड हा प्रकल्पही निर्धारीत वेळेत पूर्ण करेल असे सांगितले.