मुख्यमंत्री पर्रीकरांनी परिवारासोबत फोटो केला शेअर

0
681
 गोवा खबर :स्वादुपिंडाच्या गंभीर आजाराचा सामना करत असताना देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यातील जोश तिळभर सुद्धा कमी झालेला दिसत नाही.दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम पर्रिकर नेटाने करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
 भाजपाने कार्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी मेरा परिवार, भाजपा परिवार, असा कार्यक्रम आज आयोजित केला होता. यापार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार, माजी आमदार, कार्यकर्ते आज सकाळ पासून आपल्या घरांवर भाजपचे झेंडे लावून त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकत होते. सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिल चेअरवर बसून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी हाती भाजपचा झेंडा घेतलेला फोटो सोशल मीडिया वरुन प्रसिद्ध केला तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अनेकांनी त्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल त्यांचे कौतुक करणारे अभिप्राय दिले आहेत त्याच बरोबर अनेकांनी तब्बेतीची काळजी घ्या,असा प्रेमळ सल्ला देखील दिला आहे.

 पर्रिकर यांनी प्रसिद्ध केलेल्या फोटो मध्ये त्यांच्या बाजूला मुलगा उत्पल व त्याची बायको (मुख्यमंत्र्यांची सून) उभी असल्याचे दिसत आहे.
पर्रीकर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे असे छायाचित्र कधी जारी केले नव्हते. प्रथमच मेरा परिवार, भाजपा परिवार, असा कार्यक्रम आपणही केल्याचे दाखवून देणारे छायाचित्र पर्रीकर यांनी जारी केले आहे.  दोनापावल येथील  निवासस्थानी पर्रिकर यांनी हा छोटा कार्यक्रम केला. पर्रीकर यांच्या या ताज्या छायाचित्रामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश जाईल, असे मानले जात आहे.
भाजपा परिवाराचा आपण भाग आहोत याचा अभिमान वाटतो, असेही पर्रीकर यांनी म्हटले आहे.
 दरम्यान, दिल्लीच्या एम्स इस्पितळातून पर्रीकर यांना गेल्या आठवडय़ात डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते अजून पुन्हा पर्वरी येथील मंत्रलयात आलेले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बांबोळीला घेतलेल्या सभेवेळी ते 20 मिनिटांसाठी येऊन गेले होते.आपण आता थोडक्यात भाषण करतो बाकी जोश लोकसभा निवडणूकीसाठी राखून ठेवतो असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागवण्याचा प्रयत्न केला होता.