लष्कर प्रमुखांनी केली मुख्यमंत्र्यांच्या तब्बेतीची विचारपूस

0
545
 गोवा खबर:गंभीर स्वरूपाच्या आजाराचा सामना करत असताना देखील तिन्ही दिवस विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.गुरुवारी दुपारी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पर्रिकर यांची विधानसभेत भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे.बुधवारी अर्थसंकल्प मांडलेले  मुख्यमंत्री पर्रिकर आज बुधवारी 12 च्या सुमारास विधानसभेत पोचले.त्यानंतर आयएनएस मांडवी येथे नियोजित कार्यक्रमासाठी आलेले लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी तेथून थेटपणे विधानसभा गाठुन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. जेमतेम 5 मिनिटात पर्रिकर यांची भेट घेऊन रावत आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघुन गेले.आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.बाकी काही विषय नव्हता,असे रावत यांनी पर्रिकर यांची भेट घेऊन परत जाताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानकपणे विधानसभेत येऊन मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली होती.राहुल गांधी यांनी या भेटी नंतर केरळ येथे केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.त्याभेटीवरुन सध्या गांधी आणि पर्रिकर यांच्यात पत्रयुद्ध सुरु झाले आहे.