लोकशाही भाजपला निराश करते:राहुल गांधी

0
1431

 गोवा खबर : माजी संरक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात राफेल वरुन काँग्रेस आणि भाजप मध्ये सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या युद्धात काँग्रेस अध्य्क्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे.

 

लोकशाही भाजपला निराश करते. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा नियोजन करून, मुद्दामहून व संघटितपणे केलेला हल्ला होता. भाजपने दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप असलेली पोस्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकून त्याला राष्ट्रीय वळण दिले आहे.
आपल्या फेसबुक वॉलवर राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. सोबत भाजपने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे.
गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे भ्याड व त्यांच्या दिल्लीत बसलेल्या बॉसना काँग्रेस घाबरत नाही, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी हाणला.
दरम्यान, शुक्रवारी राफेल प्रकरणी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपने काँग्रेस भवनसमोर मोर्चा आणला होता. त्यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर भाजप व काँग्रेसने परस्परविरोधी तक्रारी पणजी पोलिस स्थानकात नोंदवण्यात आल्या आहेत. भाजपकडून राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.
भाजपचा हल्ला हा पूर्वनियोजित आणि सरकार पुरस्कृत:काँग्रेस
दरम्यान, काँग्रेसच्या कार्यालयावर व महिला कार्यकर्त्यांवर भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला हा पूर्वनियोजित व सरकार पुरस्कृत आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भाग घेतला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे केला. तसेच तेंडुलकर आणि इतर हल्लेखोरांविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो, दिगंबर कामत, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, प्रतिमा कुतिन्हो यांच्यासोबत चोडणकर व कवळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपने मात्र राफेल प्रकरणी काँग्रेस हाऊसवर मोर्चा आणला व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर बुट व बाटल्या फेकून मारल्या असा आरोप कवळेकर यांनी केला. आम्ही संयुक्त बैठकीत याचा निषेध केला आहे. तसेच ज्या भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी ही गुंडगिरी केली, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलिस प्रमुखांसमोर ठेवत असल्याचे कवळेकर यांनी यावेळी सांगितले. गोव्यात भाजप सत्तेत आहे पण भाजपच कायदा हाती घेत आहे. गृह खात्याने अशावेळी डोळ्य़ावर बांधलेली पट्टी काढावी व राज्यात काय चाललेय ते पहावे. भाजपने यापूर्वी मांडवी पूल रोखला होता व लोकांचा रोष ओढवून घेतला होता. काही वर्षापूर्वी भाजपने म्हापशातील एका हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केली होती. आता काँग्रेस हाऊसमध्ये भाजप कार्यकर्ते घुसले व रस्ताही अडवून लोकांना त्रास केला. त्यांनी लोकांची माफी मागावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले,  काँग्रेस पक्ष कायम शांततेच्या व लोकशाही मार्गाने जातो. भाजप मात्र नथुराम गोडसेच्या मार्गाने जातो,हे कालच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कुतिंन्हो यांनी भडकवल्याने परिस्थिती चिघळली: भाजप
भाजपचा निषेध मोर्चा शांततामय मार्गाने होता. प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी भडकवल्याने परिस्थिती बिघडली. काँग्रेस महात्मा गांधी यांची गांधीगीरी नाही तर राहुल गांधी यांची गांधीगीरी करत असलल्याचा आरोप भाजपच्या वतीने प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक आणि किरण कांदोळकर यांनी केला.काँग्रेसने आज पोलिसांना सादर केलेल्या निवेदन चुकीचे असून त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करत असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.पत्रकार परिषदेत प्रतिमा कारवर  हातात चप्पल घेऊन उभ्या असलेला आणि हावभाव करून भाजप कार्यकर्त्यांना भडकवत असल्याचे फोटो दाखवुन कालच्या प्रकाराला कुतिंन्हो आणि काँग्रेस कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here