विरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली मांडवी पुलाची पाहणी

0
1795
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असून गेल्या 11 महिन्यापासून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत एकिकडे काँग्रेस राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करत असताना मुख्यमंत्री  कित्येक महिन्यांच्या कालावधी नंतर आज घरा बाहेर पडले आणि त्यांनी पणजी येथे सुरु असलेल्या तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी केली.

14 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील एम्स मधून डिस्चार्ज घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर गोव्यात परतले होते.तेथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरां मार्फत उपचार सुरु आहेत.विरोधी पक्ष काँग्रेस आणि स्वयंसेवी संघटनांनी मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले असून त्यांनी विश्रांती घेऊन दुसऱ्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे अशी मागणी केली होती.सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन सोहळयावेळी मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानावर मोर्चा देखील काढला होता.
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फक्त फोटो मधून जनतेला दर्शन देत होते.सभापती प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटी बरोबरच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बैठक आणि मंत्रीमंडळ बैठकीचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले होते.
काल बऱ्याच दिवसांनी मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबत नवा फोटो सीएमओने प्रसिद्ध केला होता.पहिल्या 3 फोटों मध्ये मुख्यमंत्री सोफ्यावर बसलेले तर कालच्या फोटोत ते उभे राहून एनआयटी गोवाच्या कायमस्वरूपी संकुलाच्या पायभरणी शिलेचे अनावरण करताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री आजारी असल्याने घरा बाहेर पडू शकत नसल्याने कालचा कार्यक्रम त्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी करण्यात आला होता.
आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारपणामुळे सरकार ठप्प झाल्याचा आरोप केला होता.त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी घरा बाहेर पडून पणजी येथील तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी करून विरोधकांची तोंडे बंद केल्याचे मानले जात आहे.
आज दुपारी 3 च्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या कारने घरा बाहेर पडले. त्यांनी पर्वरीच्या बाजूने येत मेरशी पर्यंत पुलाच्या कामाची पाहणी केली. मांडवीचा तीसरा पुल हा पर्रिकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.12 जानेवारी रोजी त्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.यापर्श्वभूमिवर पर्रिकर यांनी पुलाचे उरलेले काम वेगाने व्हावे यासाठी ही पाहणी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजच्या फोटोत त्यांच्या नाकात सलाइन घेऊन असल्याचे दिसत आहेत.त्यांच्या मागे त्याचे खाजगी सचिव काही तरी धरून उभे असल्याचे दिसत आहेत.यापूर्वी ही सलाइन दिसू नये यासाठी त्यांचे एका बाजूने फोटो प्रसिद्ध केले जात असल्याची चर्चा होती.आज ती सलाइन फोटो मध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here