गोवा खबर:गोव्यात पर्यटन आणि इतर कारणांसाठी येणारे विदेशी येथे येऊन ड्रग्सची लागवड आणि उत्पादन करु लागल्यामुळे असले अतिथी नको भव असे म्हणण्याची पाळी गोमंतकीयांवर आली आहे.विदेशी नागरिक गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय करु लागल्यामुळे पोलिसां समोर आव्हान निर्माण झाले आहे.भाडयाच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा चालवणाऱ्या ऑस्ट्रीयन नागरिकाच्या मुसक्या आवळणाऱ्या हणजुणे पोलिसांनी गांजाची लागवड करणाऱ्या रशियन जोडप्याला मुद्देमालासह बेडया ठोकल्या आहेत.
हणजुणे पोलिसांनी ताराचीभाट-शिवोली येथे भाडयाच्या फ्लैट मध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी वायचेस्लर तेरेखीन (३८) व अॅना आशारोव्हा (३८) या रशियन जोडप्याला अटक केली आहे.पोलिसांनी या जोडप्या कडून गांजाची रोपटी, गांजा, एलएसडी व लागवड यंत्रणा मिळून १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
यापूर्वी हणजुणे पोलिसांनीच 1 कोटी रुपयांच्या ड्रग्ससह ऑस्ट्रीयन नागरिकाला अटक केली आहे.हा नागरिक आपल्या गेली 5 वर्षे सलग गोव्यात येत होता.यावेळी त्याने भाडयाने घेतलेल्या घरात ड्रग्स बनवण्याची प्रयोगशाळाच सुरु केली होती.
याशिवाय कळंगुट, पर्वरी,शिवोली भागात ड्रग्सची लागवड करणाऱ्या लोकांना शोधून काढून पोलिसांनी गजाआड केले होते.
गोव्यात बाहेरुन ड्रग्स आणणे जोखमीचे ठरत असल्याने आता ड्रग्स माफिया गोव्यात ड्रग्सची लागवड आणि उत्पादन करु लागल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
हणजुणे पोलिसांनी पोलिस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.या पथकात महिला पोलिस उपनिरीक्षक लौरीना सिक्वेरा,पोलिस कॉन्स्टेबल अनंत चार,विशाल नाईक, जोशी,टी. म्हामल आदिंचा समावेश होता.