पणजीत 15 ते 22 डिसेंबर दरम्यान सेरेंडिपीटी कला महोत्सव

0
786
गोवा खबर :  संगीत, नृत्य, थिएटर, पाककला, शिल्पकला, व्हिज्युअल आर्टविषयक वैभवसंपन्न वारशावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गोव्यात येत्या 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रायबंदर व पणजीसह एकूण दहा ठिकाणी हा महोत्सव कलाप्रेमींची गर्दी खेचणार आहे.
 सेरेंडिपीटी महोत्सवात अनेक प्रदर्शने, कार्यक्रम व सादरीकरण दहा ठिकाणी केली जातील. रायबंदर येथील जुन्या गोवा मॅनेजमेन्ट संस्थेच्या इमारतीत सेरेंडिपीटी महोत्सवाचे मुख्य ठिकाण असणार आहे. या महोत्सवाची सगळी तयारी या इमारतीत व पणजी शहरात सुरू आहे. यापूर्वी दोनवेळा हा महोत्सव गोव्यात पार पडला.
सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनची स्थापना 2016 साली सुनीलकांत मुंजल यांनी केली. यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाने आतापर्यंत गोव्यातील कला निर्माणाच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
 सांस्कृतिक विकास, दक्षिण आशियातील उदयोन्मूख कलाकारांना पाठींबा देणे हा यंदाच्या सेरेंडिपीटी आर्ट्स महोत्सवाचा केंद्रबिंदू असणार आहे. देशाच्या विविध भागांतील कलेचे मिश्रण करून निर्माण केलेले प्रकल्प सेरेंडिपीटी महोत्सवस्थळी पहायला मिळतील. मुलांचा थिएटर परफॉर्मन्स, सायंकाळचे संगीत कार्यक्रम, व्हीज्युअल आर्ट व फोटोग्राफीशीनिगडीत मोठी इन्स्टॉलेशन्स ही सेरेंडिपीटी महोत्सवाची वैशिष्ट्यं असणार आहेत.
यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहभाग वाढेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीशी वैश्विक संवाद त्यामुळे वाढू शकेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सेरेंडिपीटी महोत्सव म्हणजे वाव न मिळालेल्या कलाकारांसाठी व्यासपीठ आहे. देशातील विभिन्न कला-संस्कृतीचे चाहते सेरेंडिपीटी महोत्सवानिमित्ताने डिसेंबर महिन्यात गोव्यात भेट देतील.  22 डिसेंबर्पयत हा महोत्सव चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here