सिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी

0
577
 गोवा खबर :गोव्याच्या सिमेलगत असलेल्या  सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने सवलत द्यावी,तसेच १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
  शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामतम्हणाले, सिंधुदुर्गातील छोट्या मासळी व्यवसायिकांना गोव्यात त्यांची मासळी आणण्यासाठी आयात निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून केली होती. गोवा शिवसेना नेत्यांनाही त्यांनी या प्रकरणी मध्यस्थीचे आवाहन केले होते. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस मिलिंद गावस आरोग्यमंत्र्यांना भेटले आणि सिंधुदुर्गातील छोट्या मत्स्य व्यावसायिकां समोर निर्माण झालेली समस्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या. मालवण,शिरोडा आदी भागातून येणारी मासळी अवघ्या काही तासात गोव्यात पोचते. त्यामुळे आयातीसाठी इन्सुलेटेड वाहन किंवा एफडीए नोंदणीची सक्ती या छोट्या व्यावसायिकांना असू नये, अशी शिवसेनेची मागणी आहे.
कारवार भागातूनही काही तासात गोव्यात मासळी येते त्यामुळे त्या भागातील मासळी व्यापाऱ्यांनाही निर्बंध असू नयेत, असे कामत म्हणाले.
फॉर्मेलिनच्या प्रश्नावर बोलताना कामत  म्हणाले, १२ जुलै रोजी झालेल्या घटनेनंतर सर्वप्रथम  शिवसेनेनेच फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली परंतु अजून गुन्हेगारांना शासन झालेले नाही.
 आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा या भागातून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलीन असल्याचा संशय आहे. १२ जुलैच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे कोणीही जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. शेजारी राज्यात सीमा भागात असलेले मत्स्यव्यवसायिक त्यांची मासळी घेऊन काही तासात गोव्यात पोहोचत असल्याने त्यांना ही सक्ती नको,अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे कामत यांनी निदर्शनास आणून दिले.
गोव्यात येणाऱ्या मासळीबाबतचा कोणताही तपशील राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामत म्हणाले, आपल्या आरटीआय अर्जाला खुद्द सरकारकडूनच असे उत्तर मिळाले आहे.
येत्या सोमवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि कारवार मासळी व्यवसायिकांचा सहानुभूतीने विचार करावा आणि त्यांना सवलत द्यावी अशी मागणी करताना आयात किंवा निर्यात बंद करून फॉरमॅलिन प्रश्न सुटणार नाही. गुन्हेगारांना आधी पकडा, अशी मागणी कामत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here