सुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी

0
927

     

    गोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना राजकारणात आणणारे  राष्ट्रीय स्वयंसेवसंघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज गोवा सुरक्षा मंच पक्षातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. प्रवेशा नंतर गोवा सुरक्षा मंचच्या पक्षप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वेलिंगकर हे मांद्रे मतदार संघातून भाजपचे दयानंद सोपटे यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     राज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच विधानसभा विसर्जन अटळ असून लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित करताना वेलिंगकर यांनी 35 मतदारसंघांमध्ये पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करील, असे जाहीर केले. ही निवडणूक गोसुमंसाठी सेमिफायनल असेल असे नमूद करताना एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही त्यांनी दिला असल्यामुळे त्यांचा राजिकय प्रवेश भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
     माध्यम प्रश्नावर गेली सात वर्षे लढा देणाऱ्या वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारशी असलेले संबंध तोडले आहेत. त्याशिवाय संघाशी देखील त्यांनी फारकत घेतली आहे.
     गेल्या विधानसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाचे ते मार्गदर्शक होते परंतु राजकारणात सक्रीय नव्हते. आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा अर्ज भरुन पक्षात प्रवेश केला.
    वेलिंगकर यांनी भाजप आघाडी  सरकावर जोरदार तिकास्त्र सोडताना  प्राथमिक शिक्षणाबाबत माध्यम प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  विश्वासघात केल्याने त्याची फळे भाजपला भोगावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.
     प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान रद्द करावे या मागणीवर पक्ष ठाम असल्याचे वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
    आजारी असूनही मुख्यमंत्रीपद स्वत:कडेच रहावे या पर्रीकर यांच्या हट्टापायी राज्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करून वेलिंगकर म्हणाले, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेले नाही.
     गोव्यात भाजपच्या जडणघडणीत सुरवातीपासूनचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी संघाचे अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या कामासाठी भाजपला दिले याची खंत आता वाटते. या सरकारने जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. पर्रीकर यांनी एकाधिकारशाही चालवली असून राज्य रुग्णशय्येवरुन चालवले जात आहे.एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन,असा गर्भित इशारा वेलिंगकर यांनी दिला आहे.
     माझे कार्यकर्ते हीच माझी शिदोरी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये मिळविलेली १0 हजार ५00 मते हा खरे तर गोसुमंचा विजयच आहे. लोक आमच्याबरोबर आहेत हे यातून सिध्द होते, असे वेलिंगकर म्हणाले.
    गोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गांवकर यांनी पुढील पाच वर्षात सरकार हे गोसुमंचेच असेल आणि वेलिंगकर मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here