ओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त

0
472
गोवा खबर: दाबोळी विमानतळावर ओमान एअरच्या विमानातून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रवाशच्या बॅगेतून  ४५० ग्राम तस्करीचे सोने आढळून आले. त्या प्रवाशाने  तस्करीचे सोने पावडर करून आणल्याचे तपासणीत उघड झाले आहे.सदर सोने  जप्त करण्यात आलेले असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांनी दिली आहे.
 कस्टम विभागाने काल कारवाई करून तस्करीद्वारे आणलेले ४५० ग्राम सोने दाबोळी विमानतळावर जप्त केले. दाबोळी विमानतळावर आलेल्या ओमान एअर विमानातील (डब्ल्यू-व्हाय-०२०२) एका आंतरराष्ट्रीय प्रवाशावर कस्टम अधिकाऱ्यांना संशय आल्याने  त्याची कसून तपासणी करण्यात आली. त्यात त्याच्या हातात असलेल्या बॅगेत सहा तपकिरी रंगाची पाकीटे असल्याचे कस्टम अधिका-यांना प्रथम दिसून आले. या पाकीटांची तपासणी केली असता त्याच्या आत सहा छोट्या प्लास्टिक पाकिटात सोनेरी रंगाचा पावडर असल्याचे कस्टम विभागाला दिसून येताच याची तपासणी केली असता ती पावडर सोने असल्याचे निष्पन्न झाले.
 तस्करीचे सोने ४५० ग्राम वजनाचे असून त्याची रक्कम केवढी होत आहे याबाबत तपासणी चालू असल्याची माहीती कस्टम विभागाने दिली असली तरी भारतीय बाजार भावानुसार सदर सोन्याची किंमत एकंदरीत १३ लाख ९० हजार रुपयांच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तस्करी करून आणण्यात आलेले  सोने कस्टम अधिका-यांनी १९६२ च्या कस्टम कायद्याखाली जप्त केले आहे.  दाबोळी विमानतळावर हे सोने उतरवल्यानंतर ते कुठे नेण्यात येणार होते याबाबतही कस्टम अधिकारी सध्या तपास करीत आहेत.