भाजपसमोर धर्मसंकट; मगो लढवणार पोटनिवडणुका

0
1061
गोवा खबर: दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे नाराज झालेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या विरोधात दंड थोपटल्या नंतर घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाने पक्ष बदलूंना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
अंतर्गत धुसफुशीने त्रस्त बनलेल्या भाजपची डोकेदुखी आता मगो पक्षाने वाढवली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून बरे होईपर्यंत त्यांचा ताबा सरकारातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे द्यावा, अन्यथा स्वतंत्र विचार करावा लागेल, असा इशारा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी  दिला आहे.
 त्याचबरोबर मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणूक मगो पक्ष लढविणार असल्याची घोषणाही केल्यामुळे भाजप धर्म संकटात पडला आहे.पार्सेकर,मगो बरोबरच राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे माजी सरसंघचालक सुभाष वेलिंगकर यांनी देखील भाजप विरोधात आघाडी उघडल्यामुळे भाजपसाठी मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जड जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सरकारचे काम ठप्प: ढवळीकर
भाजपकडून पर्यायी नेतृत्वाच्या विषयावर चालढकल केली जात आहे, अशी भावना आता आघाडी घटकांची बनली आहे. या नाराजीला मगो पक्षाने काल उघडपणे वाचा फोडली. सरकारचे काम ठप्प झाले आहे. प्रशासन कमकुवत चालले आहे. राज्यासमोरील खाणीसारखा ज्वलंत विषय प्रलंबित असल्यामुळे लाखो खाण अवलंबित चिंतेत आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर जनतेचा रोष वाढेल आणि त्यातून सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. या सरकारचा एक जबाबदार घटक या नात्याने आता मगो पक्षालाच पुढाकार घेऊन भाजपला परिस्थितीची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे, असे  ढवळीकर यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्याकडे पर्यायी ताबा द्यावा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन बराच काळ लोटला आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते बैठक घेऊ शकत नाहीत. ते बरे होऊन परत कामावर रूजू होईपर्यंत मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्याकडे पर्यायी ताबा द्यावा आणि सरकारचे काम पुढे न्यावे, यामागणीवर देखील ढवळीकर कायम आहेत.
…तर मगो पक्षाला वेगळा विचार करावा लागेल
एका महिन्याच्या आत या प्रस्तावावर विचार झाला नाही तर मात्र मगो पक्षाला वेगळा विचार करावा लागेल, असा  इशारा ढवळीकर यांनी दिला. केंद्रात भाजपचे सरकार असूनही खाणींचा विषय का सुटत नाही, असा प्रश्न खाण अवलंबित विचारत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे. तरीही केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही. खाण अवलंबितांची सहनशीलता संपू लागली आहे. या लोकांना अधिक काळ ताटकळत ठेवणे अयोग्य आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
 पक्षबदलू प्रकार लोकशाहीला शोभणारे नाहीत
 पक्षबदलू राजकारण्यांवरही दीपक ढवळीकर यांनी कडाडून टीका केली. राज्यात पक्षांतराचा सर्वांत मोठा फटका मगो पक्षाला बसला आहे. मगो पक्ष म्हणजे ‘आमदार पुरवठा करणारी फॅक्टरी आहे’, अशी आेळख कधी काळी बनली होती. यानंतर पक्षांतर बंदी कायदा मंजूर झाला आणि हे प्रकार थांबले. आता या कायद्यावरही कुरघोडी करून थेट आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतरे करून पुन्हा पोटनिवडणूक लादण्याचे धाडस काही नेते करू लागले आहेत. हे प्रकार लोकशाहीला शोभणारे नाहीत, अशा शब्दात ढवळीकर यांनी नाराजी व्यक्त केली.
राजीनामा देणाऱ्यांकडून निवडणुकीचा खर्च वसूल करावा
राजीनामा देणाऱ्यांकडून निवडणुकीचा खर्च वसूल करावा, अशी मागणी करून ढवळीकर म्हणाले,राज्यात अलिकडे पक्षांतराला उधाण आले आहे. अशा पद्धतीने सत्तेसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन अन्य पक्षात प्रवेश करणाचे प्रकार रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती व्हायला हवी. स्वार्थासाठी पक्षांतर करून पोटनिवडणुका लादणाऱ्या नेत्यांकडूनच या निवडणुकीचा खर्च वसूल करून घ्यायला हवा. यासंबंधी गरज भासल्यास मगो पक्ष सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे.
अलिकडेच दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मांद्रे आणि शिरोडा होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेचा विश्वासघात करून आमदारकीचा राजीनामा दिलेल्या या उमेदवारांच्या विरोधात मगो पक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील ढवळीकर यांनी केली.
राजकारणात सक्रिय होईन:वेलिंगकर 
 भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात उतरण्याचा आग्रह धरल्यास त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून राजकारणात सक्रिय होईन, असा जाहीर खुलासा मंचचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केला. त्याचबरोबर मंचाच्या माध्यमातून लवकरच गोव्यात लोककल्याणकारी राज्याची स्थापना करू, असा विश्वासही प्रा. वेलिंगकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी वेलिंगकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर थेट शरसंधान साधले. गोव्याचेच नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्यासाठीच पर्रीकार यांच्यासारखे नेतृत्व आपण घडवले. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या भाजप संस्थापकांच्या तत्त्वांना त्यांनी तिलांजली दिली. भाजपने अतिशय गलिच्छ राजकरण केले. या राजकारणापासून गोव्याचे राजकारण स्वच्छ करणे गरजेचे आहे. गोव्याच्या राजकीय शुद्धीकरणाची सुरुवात मांद्रेतूनच करूया, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले