कळंगुट समुद्रात बुड़ुन मध्यप्रदेशच्या युवकाचा मृत्यू

0
942
गोवा खबर: लुबान चक्रीवादळामुळे कळंगूटच्या खवळलेल्या समुद्रात उतरलेल्या विश्वास नाईक या 19 वर्षीय मध्य प्रदेशच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला.
14 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात कोणीही जाऊ नये,असा इशारा दिलेला असतानाच तो इशारा धुडकावून मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
कळंगूटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल सायंकाळी 6.30 वाजता मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरला होता.त्यावेळी समुद्र खवळलेला होता. जोरदार लाटांनी त्यापैकी तिघांना खेचून आत नेले. दोघांनी पाण्याशी झुंज देऊन आपला जीव वाचवला. मात्र विश्वास आनंद नाईक (इंदूर-मध्य प्रदेश) हा पाण्यात खेचला गेला. पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम चालवल्यावर आज सकाळी 9 वाजता बागा बीचवरील समुद्रात त्याचा मृतदेह सापडला.
आज दुपारी पुन्हा एकदा भरती आल्यामुळे उत्तर गोव्यातील मोरजी, मांद्रे, कळंगूट,कांदोळी, बागा तसेच दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, कासावली या प्रसिद्ध किना-यांसह बाकीचे सर्व किनारे पाण्याखालीच होते.
दुपारी भरतीनंतर पाण्याची पातळी अधिकच वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरू नये यासाठी किना-यावरील जीवरक्षकांकडून प्रयत्न चालू होते. मात्र कित्येकजण त्यांना न जुमानता पाण्यात उतरताना दिसत होते. 14 ऑक्टोबरपर्यंत  समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे धोका वाढला असून पाण्यात कुणी उतरु नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.