लुबानचा गोव्यातील शॅक व्यवसायिंकाना फटका;पाणी शिरून लाखोंचे नुकसान

0
601
 गोवा खबर:  अरबी समुद्रात आलेल्या लुबान वादळाचा फटका गोव्याला बसला आहे.पर्यटन हंगामासाठी किनाऱ्यावर नुकत्याच उभारल्या गेलेल्या शॅक मध्ये समुद्राचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 दक्षिण गोव्यात कोलवा, माजोर्डा, बेताळभाटी आणि बाणावली या किना-यांवर हा फटका अधिक बसला आहे.उत्तर गोव्यात कांदोळी किनाऱ्याला याचा फटका बसला. मंगळवारी रात्री पाण्याची पातळी वाढल्याने शॅकमध्ये पाणी घुसले होते. आज देखील कित्येक शॅक पाण्याखालीच असल्याचे दिसून येत होते. गोव्यात पर्यटन मौसम सुरू होऊन एक आठवडा झालेला असतानाच या वादळाचा तडाखा बसल्याने शॅकवाल्यांचे नुकसान झाले आहे.
 आज कित्येक शॅकवाले आपल्या बेडस् व इतर सामान सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत होते. सध्या गोव्यात किनाऱ्यांवर शॅक उभारणीचे काम चालू आहे. तर काही ठिकाणी शॅक उभे करण्यात आले आहेत. जे शॅक उभारले होते त्या शॅक मालकांचीही मंगळवारी पळापळ उडाली होती. मागच्या वर्षी आलेल्या ओखी वादळात गोव्यातील शॅकवाल्यांना असाच फटका बसला होता.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक झालेल्या वाढीचा मोठा फटका सासष्टीतील कोलवा ते बेताळभाटी-माजोर्डा-उतोर्डा पट्ट्यात सुरू असलेल्या शॅकांच्या उभारणीवर झालेला दिसुन आला.
 या भागात अनेक शॅकांचे काम सुरू होते. त्यांना या निसर्गाच्या प्रकोपाचा फटका बसला आहे. त्यांचे स्टँड, शॅक उभारणीसाठी आणलेल्या लाकडी फळ्या या पाण्यात वाहून गेल्या व नुकसान तर झालेच पण शॅक उभारणीत आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here