मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच राहतील:शहा

0
723
 
गोवा खबर:स्वादुपिंडाच्या कर्करोगावर दिल्ली येथील एम्समध्ये उपचार घेईपर्यंत कोणताही नेतृत्व बदल केला जाणार नसून मुख्यमंत्रीपदी पर्रिकर हेच कायम राहतील,असे आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करून स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांनी प्रकृती ठीक नसल्याने पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 3 निरीक्षक पाठवून पर्रिकर यांच्या गैर हजेरीत सरकार कसे चालवायचे याबाबत भाजप आणि आघाडीच्या आमदारांची तसेच भाजप कोअर कमीटीची मते जाणून घेतली होती.

त्यानंतर गेल्या आठवड्याच्या अखेरीस भाजपचे 3 खासदार आणि गोव्यात पाठवलेल्या 3 निरीक्षकां सोबत एकत्र बैठक घेऊन विविध पर्यायांचा आढावा घेतला होता.त्यानंतर 2 दिवसात शहा आपला निर्णय कळवतील अशी शक्यता बैठकीत सहभागी झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली होती.
गेले दोन दिवस गोव्यात सगळेच शहा यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते.त्यानुसार आज शहा यांनी आज ट्वीट करून मुख्यमंत्री पदी पर्रिकर हेच कायम राहतील.तसेच मंत्रीमंडळ फेरबदल आणि खातेवाटप लवकरच केले जाईल असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाल्या पासून भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेले गोवा फॉरवर्ड आणि मगो एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते.त्यापार्श्वभूमीवर पर्रिकर हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि त्यांच्याकडील अतिरिक्त खाती घटक पक्षांमध्ये वाटली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.त्यानुसारच शहा यांनी निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकांसाठी भाजपला घटक पक्षांची आणि अपक्षांची मदत अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असल्याने घटक पक्ष कोणत्याही कारणाने दुखावले जाणार नाहीत याची खबरदारी भाजप नेते घेतील हे सगळ्यांनी गृहीत धरले होते.