आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू;एक दिवशीय अधिवेशन बोलवा:काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

0
474
गोवा खबर:सध्या सरकार अस्तित्वात असून नसल्या सारखे आहे.सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही.त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्या. त्यासाठी एका दिवसाचे अधिवेशन बोलवा आम्ही त्यात बहुमत सिद्ध करून दाखवू, अशी भूमिका काँग्रेसच्या 15 आमदारांनी आज सायंकाळी राज्यापालांची भेट घेऊन केली.
सरकार अस्थिर असून प्रशासन ठप्प झाले असल्याने भाजपने विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयन्त केल्यास तो मान्य करू नये.भाजपला सरकार चालवता येत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थानपनेची संधी द्या. आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू असे काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आले.
राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून आल्या नंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते कवळेकर म्हणाले,भाजप आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.जो तो नेता बनण्याची स्वप्न बघू लागला आहे.प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे.भाजप अशावेळी विधासभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.लोकांनी आम्हाला 5 वर्षांसाठी निवडून दिले आहे.भाजपला सरकार चालवायला जमत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.येत्या 2 ते 3 दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याला कळवले जाईल असे राज्यपालांनी आम्हाला सांगितले आहे.
भजपने निरीक्षक पाठवून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसे चालवता येईल याची पड़ताळणी करत असताना काल काँग्रेसने विधीमंडळाची बैठक घेऊन विधानसभा बरखास्त करणे किंवा राष्ट्रपती राजवटी सारखे पर्याय भाजपने वापरू नये यासाठी काही घडण्यापूर्वीच राज्यपालांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला.मात्र काल राज्यपाल गोव्या बाहेर असल्याने काँग्रेसने आज त्यांच्या भेटीसाठी वेळ मागीतली होती.राज्यपालांनी काँग्रेसला भेटण्यासाठी आज सायंकाळची वेळ दिली होती.आज आलेक्स रेजीनाल्ड वगळता काँग्रेसचे 15 आमदार आज उपस्थित होते.काँग्रेसचे सगळे आमदार एकसंध असून बहुमत सिद्ध करताना काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे उघड़ केले जाईल असे सांगून कवळेकर म्हणाले,सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या सोबत कोण कोण आहेत याचे उत्तर देखील योग्य वेळी मिळेल असा दावा कवळेकर यांनी करत पुन्हा एकदा  काँग्रेसचे आव्हान जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे.