पणजी:कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधात धडक कारवाई करत बागा येथून 1 लाख 30 हजार रुपयांच्या गांजा आणि चरससह चीनेडू मंडे या 30 वर्षीय नायजेरीयन तरुणास अटक केली आहे.
कारवाई संदर्भात अधिक माहिती देताना कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी म्हणाले,खात्रीशीर सुत्रांकडून मंडे हा आपल्या ग्राहकाला ड्रग्स देण्यासाठी बागा येथील फॅट फिश रेस्टोरेन्ट जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती.
कळंगुट पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने बागा येथील नियोजित ठीकाणी दबा धरला.मात्र मंडे नेमका कुठे येणार हे नक्की नसल्याने पोलिसांना तो येणार असलेल्या मुख्य रस्त्यां बरोबर आसपासच्या परिसरात नजर ठेवणे भाग होते.पोलिसांना मिळालेली खबर खरी ठरली.मंडे ठरलेल्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला घेरुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
मंडेची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपयांचा गांजा आणि 80 हजार रुपयांचा चरस आढळून आला.दोन्हींची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 लाख 30 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आली.अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत मंडेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यासाठी नेमलेल्या पथकात पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर आणि विनोद केरकर सहभागी झाले होते.