गोवा खबर:धनगर समाजोन्नती मंडळाने आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत पोलिस महासंचालकांची भेट घेऊन सांगेचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्ककर यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली. या धरणे आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
धनगर समाजाचे जवळपास 100 लोक आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.9 जून रोजी एकोस्कर यांनी धनगर समाजाच्या जानू झोरे या युवकाला मारहाण करून देखील त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याबद्दल यावेळी उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे सांगे तालुका अध्यक्ष बाबू रेकडो यांनी पोलिस निरीक्षक एकोस्ककरांच्या वाढत चाललेल्या दहशती बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रेकडो म्हणाले,जानू झोरे हा आपल्या भावा सोबत एक प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी गेला होता मात्र एकोस्कर यांनी पोलिस स्थानकातच जानूला विनाकारण बेदम मारहाण केली आणि त्याच्या फोनची देखील मोडतोड केली.
यावेळी घडलेला प्रसंग लोकांचा पोलिस यंत्रणे वरील विश्वास उडवणारा होता असे सांगून रेकडो म्हणाले,त्यादिवशी पोलिस स्थानकात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या देखत जानू झोरे याला मारहाण झाली आहे.तेथे उपस्थित असलेल्या वकीलाने हा प्रसंग आपल्या डोळ्यानी बघितला आहे.जानू हा आपल्या भावाला सोबत देण्यासाठी पोलिस स्थानकात आला होता.त्याने त्यावेळी वाद निर्माण होईल असा एकही शब्द उच्चारला नव्हता.
यावेळी उपस्थित जानू झोरे यांनी देखील एकोस्कर यांच्या गैर कारभाराचा पाढा सगळ्यां समोर वाचला.झोरे म्हणाला,एकोस्कर यांनी मला शिवीगाळ करत बोलायला सुरुवात केली. मी त्यांच्या शिवराळ भाषेला आक्षेप घेतला.त्या नंतर चीडलेल्या एकोस्कर यांनी काही समजायच्या आत मला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
जानू झोरे यांना एकोस्कर यांनी केलेली मारहाण इतकी गंभीर होती कि त्यांना 3 दिवस मडगाव येथील होस्पिसियो हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले होते याकडे लक्ष वेधून शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक यांनी एकोस्कर यांची दादागिरी न थांबल्यास लोकांचा सरकार वरील विश्वास उडेल असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली.नाईक यांनी एकोस्कर हे सांगे पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही बंद राहतील याची काळजी घेत असून सीसीटीव्ही सुरु असते तर एकोस्कर यांचे कारनामे उघड़ झाले असते असा दावा केला. नाईक यांनी एकोस्कर यांनी अमित नाईक यांना पोलिस कोठडीत केलेल्या अमानुष मारहणीचे उदाहरण यावेळी सांगितले.
जानू झोरे मारहाण प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेले वकील प्रवेश मिशाळ म्हणाले,जनतेचे रक्षक असे वागत असतील तर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा. या प्रकरणात एकोस्करां विरोधात खरे तर कडक कारवाई होण्याची गरज आहे.
धनगर समाजोन्नती मंडळाने पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांची भेट घेऊन एकोस्कर यांना निलंबित करून तटस्थ यंत्रणे मार्फत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. आवश्यक ते पुरावे चौकशी यंत्रणेला सादर करून मदत करू असे देखील धनगर समाजाच्या वतीने पोलिस महासंचालकांना सांगितले.एकोस्कर यांच्या बेकायदा वर्तना कडे वरिष्ठ पोलिस अधिकारी दुर्लक्ष करत राहिले तर एखाद्या दिवशी सांगे पोलिस स्थानकाच्या कोठडीत एखाद्याचा जीव सुद्धा जावू शकतो,या धोक्याकडे शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधले.