11 व्या  आयएफबी ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा उद्या उघडणार

0
589
• राज्यपाल मृदुला सिन्हा करणार उद्घाटन
• सिनेकर्मी मधुर भांडारकरसह मराठी मधील दिग्गज कलाकार लावणार हजेरी
गोवा खबर:मराठी चित्रपटप्रेमी ज्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची चातका प्रमाणे वाट बघत होते त्या 11व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा उद्या उघडला जाणार आहे.महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उद्या मराठी चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत महोत्सवाचे थाटात उद्धाटन केले जाणार आहे.
पणजी बरोबर वास्कोमध्येही प्रदर्शन
 गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे प्रदर्शन यावर्षी शुक्रवार 8 ते रविवार 10 जून दरम्यान पणजीतील गोवा कला अकादमी, मॅकेनिज पॅलेस, आयनॉक्स आणि 1930 (वास्को) या सिनेगृहांमध्ये होणार आहे.
यामध्ये वर्षभरातील महत्वाचे मराठी चित्रपट, लोकप्रिय कलाकार- दिग्दर्शकांची प्रमुख उपस्थिती, रेड कार्पेट, सिनेमाधारित विशेष चर्चासत्रे, शैक्षणिक कार्यशाळा, नामवंत कलाकारांना मानवंदना, नव्या सिनेमांचे प्रिमिअर आदींचा समावेश असणार आहे.
राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याहस्ते उद्घाटन
यावर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याहस्ते पारंपरिक पध्दतीने दिपप्रज्वलन करुन होणार आहे. यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, खासदार संजय राऊत, राष्ट्रीय पुरस्कारविजेता सिनेकर्मी मधुर भांडारकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर विविध मनोरंजक कार्यक्रम सादर होतील.
वेलकम होम उद्धाटनाचा सिनेमा
 महोत्सवाचा शुभारंभ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक द्वयांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या ‘वर्ल्ड प्रिमिअर’ने होणार आहे.
कृतज्ञता पुरस्कार पार्श्वगायिका लॉर्नाला
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कृतज्ञता पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गोमंतकीय पार्श्वगायिका लॉर्ना यांना प्रदान करण्यात येणार आहे.
20 चित्रपट आणि 6 लघुपटांची पर्वणी
यावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्द. गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्द. धोंडिबा कारंडे), इडक (दिग्द. दिपक गावडे), सत्यजित रे : लाइफ अ‍ॅण्ड वर्क (दिग्द. विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्द. सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्द. रवी जाधव), बबन (दिग्द. भाऊसाहेब कर्हाडे), आम्ही दोघी (दिग्द. प्रतिमा जोशी), झिपर्‍या (दिग्द. केदार वैद्य), कच्चा लिंबू (दिग्द. प्रसाद ओक), लेथ जोशी (दिग्द. महेश जोशी), रणांगण (दिग्द. राकेश सारंग), बकेट लिस्ट (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (दिग्द. सागर वंजारी), व्हॉटस्अप लग्न (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटाचाही आस्वाद घेता येणार आहे.
सविता दामोदर परांजपेने होणार समारोप
 बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम निर्मित आणि स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या जागतिक प्रिमिअरने महोत्सवाचा समारोप होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह सविता दामोदर परांजपेचा निर्माता जॉन अब्राहम,दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी,सुबोध भावे,तृप्ती तोरडमल आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.
दिग्गज कलाकारांची असणार हजेरी
 यंदा मराठी बिग बॉस महेश मांजरेकर, सचिन कुंडलकर, सचिन पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी,गजेंद्र अहिरे,जॉन अब्राहम, सुमीत राघवन, राकेश बापट, प्रिया बापट, स्पृशा जोशी यांच्यासह प्रमुख कलाकार हजेरी लावणार आहेत. आजवर विक्रम गोखले, अमोल पालेकर, नाना पाटेकर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर, रवी जाधव, सचिन खेडेकर, वर्षा उसगांवकर आदी मान्यवर कलाकारांनी आजवर उपस्थिती नोंदवली आहे.
गोवा कला अकादमी सिनेगृह प्रायोजक
‘विन्सन वर्ल्ड’ या आघाडीच्या गोमंतकीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या या महोत्सवाला गोवा कला अकादमी सिनेगृह प्रायोजक आहे. तर टायटल पार्टनर म्हणून आयएफबी, डिजिटल अ‍ॅण्ड ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून ‘प्लॅनेट मराठी’ असणार आहे. या महोत्सवात ‘प्लॅनेट मराठी’च्यावतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिध्द निवेदक अमित भंडारी सूत्रसंचालन करणार आहे. या चर्चासत्राचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. या महोत्सवातील काही चित्रपटांचे विशेष प्रदर्शन वास्कोस्थित ‘1930’ या नव्याने साकारलेल्या सिनेगृहामध्येही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्यासह महाराष्ट्र अणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रसिकाश्रय मिळत असलेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी…
• विन्सन ग्राफिक्स, 309, तिसरा मजला, गेरा एम्पोरिअम 2, पाटो प्लाझा, पणजी.
• गोवा कला अकादमी, कांपाल, पणजी.
• नाटेकर फार्मसी, 5, शिवसागर अपार्टमेंट, मारुती मंदिराजवळ, म्हापसा.
• विन्सन ग्राफिक्स, हॉटेल अनंताश्रमच्या शेजारी, वास्को.
• रंग रचना, विवेक बिल्डिंग, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर, खडपाबांध, फोंडा.
• माया बुक स्टोअर, 1, विट्रोस मॅन्शन, इसिडोरिओ बाप्टीस्टा मार्ग, ग्रेस चर्चच्या मागे, मडगाव
आदींसह बुकमायशो डॉट कॉम याठिकाणी सुरु आहे.
अधिक माहितीसाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत फेसबुक पेजhttps://www.facebook.com/gmffonline/
वेबसाईट : http://www.vinsanworld.com/gmff/ यावर भेट द्या.