गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ 8 जूनपासून

0
1094
– 11 व्या वर्षांत 16 उत्तम चित्रपटांची मेजवानी
– यंदाचा कृतज्ञता पुरस्कार पार्श्वगायिका लॉर्ना यांना
 गोवा खबर:गेल्या दहा वर्षांपासून गोवा आणि परिसरातील मराठी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत लोकप्रशंसा आणि लोकमान्यता मिळवणार्‍या ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ पुन्हा एकदा लोकरंजनासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी 8 ते 10 जून दरम्यान कला अकादमी, आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस या सिनेगृहांमध्ये होत असलेल्या या महोत्सवाचे हे गौरवशाली 11 वे वर्ष आहे.
महोत्सवाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कृतज्ञता पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गोमंतकीय पार्श्वगायिका लॉर्ना यांना जाहीर करण्यात आला असून, महोत्सवामध्ये या पुरस्काराचे सन्मानाने वितरण करण्यात येणार आहे.
वर्षभरातील महत्वाचे मराठी चित्रपट, लोकप्रिय कलाकारांची दिग्दर्शकांची प्रमुख उपस्थिती, रेड कार्पेट, सिनेमाधारित चर्चासत्रे, शैक्षणिक कार्यशाळा, नामवंत कलाकारांना मानवंदना, नव्या सिनेमांचे प्रिमिअर आदींमुळे गोव्यासह महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि कर्नाटकातील बेळगाव, खानापूर आदी भागांमध्ये ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ विशेष लोकप्रिय आहे.
प्रसिध्द सिनेअभिनेत्री माधुरी दिक्षीत यांना महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे असून, मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे पारंपरिक पध्दतीने दिपप्रज्वलन करत उद्घाटन होईल. त्यानंतर विविध मनोरंजक कार्यक्रम सादर होतील. त्याचप्रमाणे यावर्षाच्या महोत्सवाचा शुभारंभ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक द्वयांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या ‘वर्ल्ड प्रिमिअर’ने होत आहे.
यावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्द. गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्द. धोंडिबा कारंडे), इडक (दिग्द. दिपक गावडे), सत्यजित रे : लाइफ अ‍ॅण्ड वर्क (दिग्द. विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्द. सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्द. रवी जाधव), बबन (दिग्द. भाऊसाहेब कर्‍हाडे), आम्ही दोघी (दिग्द. प्रतिमा जोशी), झिपर्‍या (दिग्द. केदार वैद्य), कच्चा लिंबू (दिग्द. प्रसाद ओक), लेथ जोशी (दिग्द. महेश जोशी), रणांगण (दिग्द. राकेश सारंग), बकेट लिस्ट (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (दिग्द. सागर वंजारी), व्हॉटस्अप लग्न (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटाचाही आस्वाद घेता येणार आहे. तर सुबोध भावे यांच्या ‘पुष्पक विमान’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

या महोत्सवाला मराठी चित्रपट जगतातून खूप उत्स्फूर्त आणि प्रोत्साहक प्रतिसाद सुरुवातीपासूनच लाभत असून, गोव्यामध्ये चित्रपट संस्कृती रुजवण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी चित्रपट जगतातील विविध मान्यवर कलाकार महोत्सवासाठी उपस्थित राहणार असून, विक्रम गोखले, अमोल पालेकर, नाना पाटेकर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर, रवी जाधव, सचिन खेडेकर, वर्षा उसगांवकर आदी मान्यवर कलाकारांनी आजवर उपस्थिती नोंदवली आहे.
‘मराठी चित्रपटांच्या रसिकांच्या आवडीनिवडी लक्षात घेत ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ची प्रामुख्याने आखणी करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात आम्हाला मिळालेला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद या महोत्सवाची यशस्विता विशद करण्यासाठी पुरेसा आहे. महोत्सवाच्या निवडसमितीने साकल्याने विचार करत या वर्षाच्या महोत्सवासाठी निवडलेले सिनेमे रसिकांच्या सर्वार्थाने पसंतीला उतरतील असा विश्वास आम्हा सगळ्यांनाच आहे. हा महोत्सव जरी गोव्यामध्ये होत असला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखील या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दशकभरानंतर अधिक समृध्द झालेल्या या महोत्सवावर याहीवर्षी रसिक भरभरुन प्रेम करतील, अशी अपेक्षा गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी व्यक्त केली.
‘विन्सन वर्ल्ड’ या आघाडीच्या गोमंतकीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या या महोत्सवाला गोवा कला अकादमी सिनेगृह प्रायोजक आहे. तर टायटल पार्टनर म्हणून आयएफबी, डिजिटल अ‍ॅण्ड ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून ‘प्लॅनेट मराठी’ असणार आहे. या महोत्सवात ‘प्लॅनेट मराठी’च्यावतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिध्द निवेदक अमित भंडारी सूत्रसंचालन करणार आहे. या चर्चासत्राचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
या महोत्सवातील काही चित्रपटांचे विशेष प्रदर्शन वास्कोस्थित ‘1930’ या नव्याने साकारलेल्या सिनेगृहामध्येही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्यासह महाराष्ट्र अणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रसिकाश्रय मिळत असलेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पणजी, वास्को, म्हापसा, फोंडा, मडगाव आदींसह बुकमायशो डॉट कॉम याठिकाणहून नोंदणी करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत फेसबुक पेज: Goa Marathi Film Festival वेबसाईट  HYPERLINK “http://www.goamarathifilmfestival.com” www.goamarathifilmfestival.com यावर भेट द्या.