दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळलेला आशीष नेहरा बनला रोहन खंवटे यांचा शेजारी!

0
1465
गोवा खबर: बॉलीवुड,उद्योग,फॅशन क्षेत्रातील सेलिब्रिटीना गोव्यातील मोकळ्या हवेने नेहमीच भूरळ घातलेली आहे.प्रसिद्ध क्रिकेटपटू आशीष नेहरा आता त्यात सामिल झाला आहे.
दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळलेला गोलंदाज आशीष नेहरा आता गोवेकर झाला आहे.त्याने पर्वरी परिसरात महसुल मंत्री रोहन खंवटे यांच्या शेजारीच एक बंगला भाड्याने घेतला आहे.पर्वरी येथील आयलँड व्हिला मध्ये नेहराने एक बंगला भाड्याने घेतला आहे.
नेहरा आयपीएल मध्ये रॉयल चैलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाज प्रशिक्षक आहे.आयपीएलचा हंगाम जोमात असताना देखील नेहरा वेळात वेळ काढून टेनंट्स व्हेरीफिकेशन फॉर्म नेण्यासाठी नुकताच पर्वरी पोलिस स्टेशन मध्ये  येऊन गेला.त्यावेळीचे त्याचे व्हायरल झालेले फोटो आणि त्याने काही दिवसां पूर्वी टेलीग्राफला दिलेली मुलाखतीवर नजर टाकली तर दिल्ली बाहेर राहण्यासाठी जागा शोधण्याची मोहीम गोव्यात संपली असे म्हणता येइल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्या वर्षी निवृत्ती घेतलेला भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज आशिष नेहरा याचा पर्वरी पोलिस स्थानकावरील फोटो सोमवारी सोशल मिडीयावरून व्हायरल झाल्यानंतर तो एक चर्चेचा विषय ठरला. या फोटोसंबंधी चौकशी केली असता तो भाडेकरू म्हणून नोंदणी करण्यासाठी पर्वरी पोलिस स्थानकावर आला होता,अशी माहिती मिळाली.
बॉलीवूड कलाकारांसह मोठमोठे व्यावसायिक, उद्योजकांना गोव्यात आपले सेकंड होम असावे, असे वाटत असते. त्यातूनच अनेकांनी इथे फ्लॅट आणि बंगले विकत घेतले आहेत. भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंग याने मोरजी येथे बंगला विकत घेतल्याची बातमी काही काळापूर्वी उघड झाली होती. आता आशिष नेहरा हा देखील गोव्यात स्थायिक होण्याची तयारी करीत आहे. तूर्त तो भाड्याच्या खोलीत राहणार आहे आणि म्हणूनच भाडेकरू म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी सोमवारी त्याने पर्वरी पोलिस स्थानकात हजेरी लावली होती.
गेल्याच महिन्यात टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहरा याने गोव्यात स्थायिक होण्याचा आपला इरादा स्पष्ट केला होता. निवृत्तीनंतर आपल्याला कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे आणि त्यासाठी आपण योग्य जागेची निवड करीत होतो. दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून तो मुंबईत स्थलांतरीत झाला परंतु तिथे मन रमेनासे झाल्याने त्याने गोव्याची निवड केली. गोव्यात येऊन पहिल्यांदा त्याने इथल्या परिस्थितीचा अभ्यास केला. गोव्यातील वातावरणा त्याला भावले. इथली हिरवळ,समुद्र किनारे आणि विशेष म्हणजे प्रदूषण विरहीत वातावरण आवडल्याने त्याने आपला बेत पक्का केला. सर्वांत प्रथम आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी योग्य शाळा निवडण्याचे आव्हान होते. मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटल्यानंतर आपले मुख्य काम झाले,असे त्याने पत्रकाराकडे बोलताना म्हटले होते. गोव्याचे हवामान, हिरवळ,प्रदूषणरहित वातावरण आणि समुद्र किनारे हे निवृत्तीनंतर जगण्याचे एक योग्य ठिकाण आहे, असे आपल्याला वाटले आणि म्हणूनच आपण इथे येण्याचे ठरविले,असे तो म्हणाला होता.
‘मी एक साधा माणूस आहे. मला फक्त एक शॉर्टंस, एक टीशर्ट, स्लीपर्स, सनग्लासेस आणि माझे कुटुंब सोबत हवे,असे म्हणणारा नेहरा आता गोव्यातील रस्त्यांवर मोकळ्या हवेत फिरताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.