गोवा खबर:तिवईवाडो-कळंगुट येथे झालेल्या खूनी हल्ल्यात दोघे गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले.कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाच्या 15 पर्यटकांना अटक केली आहे. गंभीर जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,काल रात्री उशिरा तीवईवाडो-कळंगुट येथील जुदे गेस्ट हाउस समोर हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन खूनी हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांना घटना स्थळावरुन ताब्यात घेतले.या हाणामारी रेमी रिबेलो(हॉटेलचा रूम बॉय)आणि व्यवस्थापक अभिलाष पाटील हे किरकोळ जखमी झाले. कळंगुट येथील राजू आणि सांगे येथील जयेश भंडारी हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमीना 108 च्या रुग्णवाहिके मधून तातडीने गोमेकॉ मध्ये हलवण्यात आले.जयेश आणि राजूवर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत. रिबेलो याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तेलंगणाच्या 15 पर्यटकांना अटक केली. ही घटना काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.या हल्ल्यात गंभीर जखमींची प्रकृती सुधारल्या नंतर त्यांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल असे दळवी यांनी स्पष्ट केले आहे.पोलिसांनी AP-29-V-7779 ही संशयितांनी वापरलेली बस देखील जप्त केली आहे.पोलिस उपनिरीक्षक कीर्तिदास गावडे हे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.