शिवसेना गोव्यात लढवणार लोकसभेच्या दोन्ही जागा:राऊत

0
679
गोवा:गोव्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम सुरु आहे.शिवसेना सुभाष वेलिंगकर यांना विश्वासात घेऊन गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्या बरोबर गोव्यात प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल अशी माहिती शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
परिमल पंडीत आणि 100 कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपली भूमिका नीट बजावता येत नसल्याचा आरोप केला. शिवसेना गोव्यातील लोकांना भेडसावणारे विषय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
गोव्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने इथल्या लोकांना अनेकदा उपचारासाठी मुंबइ, बेळगाव किंवा इतर शहरात जावे लागत असल्याचे सांगून राऊत म्हणाले,शिवसेना गोव्यात फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका देऊन सामाजिक बांधीलकी जोपासणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.नवरात्री दरम्यान आरोग्य शिबिरे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
पणजी पोटनिवडणुकीत भाजपच्या मनोहर पर्रिकर यांना कमी मताधिक्य मिळाले असल्याने ही बाब आश्चर्यकारक असल्याचे राऊत म्हणाले.भाजप सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असून असल्या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.