मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहोण्याविरोधात कडक कायदे – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

0
340

पणजी– नशेच्या अवस्थेत  समुद्रात पोहोण्याच्या उद्देशाने उतरणाऱ्यांना आळा घालणार व
त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणारा कायदा अमलात आणण्याचा मुद्दा मुख्यमंत्री  मनोहर
पर्रीकर यांच्यापुढे मांडणार असल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला बुडण्यामुळे झालेल्या मृत्यूंची दखल घेत त्यासंदर्भात आयोजित करण्यात
आलेल्या संबंधित विभागाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात  आजगांवकर यांनी
सरकारला आवश्यक वटहुकूम काढण्याचा आणि गरज वाटल्यास यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच तो
जारी करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बुडण्यामुळे
होणाऱ्या मृत्यूंमुळे राज्याचे नाव खराब होत आहे व पर्यटन खात्यासह सर्व संघटनांनी याबाबतीत जबाबदारीने
कार्यवाही करण्याची तसेच आवश्यक असल्यास पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्याची गरज
असल्याचे सांगितले. दुर्देवाने बुडणे किंवा मारामारी अशा प्रकारच्या घटनांमध्ये मद्यप्राशन केले असल्याचे
बहुतांशवेळेस समोर आले आहे. त्याचबरोबर रात्री उशीरा पर्यटक खोल समुद्रात जात असल्याचे निदर्शनास
आल्याचेही ते म्हणाले.
पर्यटक पोलिस दल, किनारपट्टी पोलिस आणि दृष्टी लाइफसेव्हिंग यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत
आजगांवकर यांनी पर्यटकांना अंधार पडल्यानंतर हॉटेल्समधील पोहण्याच्या तलावात उतरण्यास जशी
बंदी असते, तशीच ती समुद्रकिनाऱ्यांनाही लागू व्हावी याबाबत आपले एकमत व्यक्त केले.
दरम्यान पर्यटन खात्याने समुद्रकिनारपट्टीवरील सर्व शॅक चालकांना त्यांच्या शॅकमध्ये पर्यटकांना मद्यधुंद
अवस्थेत समुद्रात उतरण्यास मनाई असल्याचे दर्शवणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मद्यधुंद अवस्थेत पोहोण्याच्या धोक्यांविषयी जागृती करण्याची गरज असल्याचेही यावेळेस सांगण्यात आले.
आजगांवकर यांनी पर्यटक पोलिस दल, किनारपट्टी पोलिस आणि दृष्टी लाइफसेव्हिंग यांना
समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा आणि समुद्रातील गस्त वाढवण्यासाठी सर्वप्रकारे पाठिंबा देण्याचे जाहीर केले तसेच
उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर रूग्णवाहिकेसारख्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास सहमती
दर्शवली. संबंधित संघटनांच्या सर्व प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली असून समुद्रकिनारे आणि
पाण्यातील गस्तीचा आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा त्यांची बैठक घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here