वाळपईत राणेंचा मोठा मताधिक्क्याने विजय निश्चत-तेंडूलकर

0
594

विश्‍वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाळपईतील भाजपची ताकद वाढली आहे. येत्या विधानसभा पोटनिवडणुकीत याची प्रचिती निश्‍चितपणे येणार आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली असून भाजपचा विजय हा निश्‍चित आहे, असा विश्‍वास राज्यसभा खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला. राणे यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, माजी आमदार नरहरी हळदणकर, भाजपचे नेते सत्यविजय नाईक, देमू गावकर, नगरगाव सरपंच पराग खाडीलकर, नगराध्यक्षा परवीन शेख उपस्थित होत्या.

वाळपईतील विकासाच्या मुद्यावर बोलण्याचा अधिकार काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना नाही. कारण विश्‍वजीत राणे यांनी विकासाला गती दिलेली आहे. आज वाळपई मतदारसंघाचा बदललेला चेहरा दिसतो याचे श्रेय विश्‍वजीत राणे याना द्यावे लागणार आहे. कारण विकासाच्या बाबतीत त्यांचा हात धरणारा कोणीही नाही. यामुळे येत्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय हा निश्‍चित आहे. मात्र मतांची आघाडी मोठ्या प्रमाणावर कशी वाढणार व वाळपईत विजयाचा इतिहास कसा निर्माण होणार यासाठी प्रयत्न सुरू असून वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा बैठका घेतल्या जात असल्याचे तेंडुलकर म्हणाले.

सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेस पक्षाकडून भाजपच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांमध्ये दूही असल्याचा गैरप्रचार केला जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. सर्व कार्यकर्ते खाद्यांला खांदा लावून भाजपच्या विजयासाठी प्रचार करीत आहेत.भाजप आपलेच कार्यकर्ते घेऊन प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस पक्षाकडे स्थानिक कार्यकर्ते नसल्याने मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्याना घेऊन प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामुळे काँग्रेस विजयाची अपेक्षा कशी करू शकते असा प्रश्‍न तानावडे यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here