आपची पोटनिवडणुकीतून माघार

0
435
पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुका न लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे.त्यामुळे पणजी आणि वाळपई मतदारसंघात तिरंगी लढती होतील हे जवळपास निश्चित झाले आहे.पणजी मतदार संघातुन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर भाजपतर्फे निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर यांना उमेदवारी देऊन निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.भाषा माध्यमाच्या मुद्द्यावरुन भाजपशी पंगा घेतलेल्या गोवा सुरक्षा मंचने पक्षाच्या अध्यक्षांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.पर्रिकर यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी न देणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून पर्रिकर यांच्यावर भाषा माध्यमाचा प्रश्न सोडवण्यासाठी दबाव टाकण्याची खेळी गोवा सुरक्षा मंच खेळण्याची चिन्हे दिसत आहेत.शिवसेना त्यांना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम आदमी पार्टीने या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदिने लढवल्या होत्या पण त्यांचा एकही उमेदवार टिकाव धरु शकला नव्हता.निवडणुकी नंतर पक्षाचे काम थंडावले आहे.पर्रिकर यांच्या विरोधातील मते विभागली जाऊ नये आणि पर्रिकर यांची कोंडी व्हावी असा आपचा विचार असला तरी संघटनात्मक ताकद कमी असल्याने आपने निवडणुका लढवल्या असत्या तरी चित्र फारसे बदलले नसते असे राजकीय जाणकारांना वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here