जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ संरक्षित प्राचीन स्मारक म्हणून घोषित करा !

0
690

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शनाद्वारे मागणी !

पणजी:गोमंतकीय अस्मितेचे चिन्ह असलेला जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ संरक्षित प्राचीन स्मारक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. गोवा मुक्तदिनी जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’च्या ठिकाणी निदर्शनाद्वारे ही मागणी करण्यात आली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. शौर्य आणि धैर्य यांच्या इतिहासाची स्मृती जागृत ठेवणार्‍या वस्तू आणि वास्तू यांचे महत्त्व मोठे आहे. कारण त्या वस्तू आणि वास्तू इतिहासाच्या साक्षीदार असतात. एखाद्या राष्ट्रावरील परकियांनी केलेल्या अथवा जुलमी राजवटींनी केलेल्या अत्याचाराच्या खुणाही आज जर्मनी, अमेरिका, रशिया यांसारख्या राष्ट्रांत जतन केल्या जातात. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्याचा संदेश त्या वस्तू आणि वास्तू देत असतात. जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वीत अत्याचाराची साक्ष देत हा खांब आजही उभा आहे. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध असंख्य लोक मोठ्या धैर्याने लढले. त्यांचे हजारो वंशज आजही गोव्याचे भूमिपूत्र आहेत. आंदोलनाअंतर्गत पुढील मागण्या शासनाकडे ठेवण्यात आल्या आहेत. ‘हात कातरो’ खांब एक ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्यात यावा. खांबाच्या संरक्षणासाठी संरक्षक कुंपण उभारावे. खांबाच्या शेजारी ठसठशीतपणे दिसेल, असा पितळी अथवा दगडी फलक लावण्यात यावा आणि यासाठी इतिहासाचा अभ्यास असणार्‍या गोमंतकीयांचे साहाय्य घ्यावे. खांबाची निगा राखावी. राज्यातील पर्यटन स्थळांमध्ये अधिकृतपणे या खांबाचा समावेश करावा. शासनाच्या संकेतस्थळावरही त्याचा उल्लेख करावा. निदर्शनाच्या वेळी दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. निदर्शनात सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.
आंदोलनामध्ये सहभागी संघटना – हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, शिवप्रेमी संघटना-वाळपई, मराठी राजभाषा समिती, शिवसेना, गोवा युवाचार्य संघटना, भारतीय संस्कृती रक्षा समिती, स्वराज्य निर्माण संघटना
आंदोलनाला संबोधित केलेल्या वक्त्यांची नावे – सर्वश्री जितेश कामत, समीर गावस, मच्छिंद्र च्यारी, विश्‍वराव सामंत, संतोष कापडी, रमेश नाईक आणि जयेश थळी